Soyabean Bajarbhav Hike : दिवाळीच्या काळात सोयाबीन उत्पादकांसाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे देशातील बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड तसेच सोयाबीन बाजारभावात वाढ झाली आहे. यामुळे दिवाळीच्या आनंददायी परवात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. वास्तविक गेल्या एका वर्षांपासून सोयाबीनचे भाव देशांतर्गत दबावात आहेत.
यामुळे पिवळं सोनं म्हणून ओळखलं जाणार हे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहेत. एकतर सातत्याने या पिकाच्या उत्पादकतेत घट येत आहे. पिकाची एकरी उत्पादकता कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. अतिवृष्टी, अवकाळी, ढगाळ हवामान, दुष्काळ यांसारख्या संकटांमुळे पिकावर रोगराईचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
यामुळे उत्पादनात घट आली आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना एकरी फक्त दोन ते तीन क्विंटल उत्पादन मिळाले आहे. काही शेतकऱ्यांना तर एवढेही उत्पादन झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात चांगला भाव मिळण्याची आशा होती.
पण या नवीन हंगामाच्या सुरुवातीपासूनच पिवळं सोनं काळवंडल आहे. मालाला चांगला भाव मिळत नाहीये. पण गेल्या दोन आठवड्यात परिस्थिती थोडीशी बदलली आहे. गेल्या एका महिन्याचा विचार केला तर या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे भाव 20 टक्क्यांनी वाढलेत.
याचा परिणाम म्हणून देशांतर्गत सोयाबीन दर 200 ते 300 रुपयांनी वाढले आहेत. फक्त दोन आठवड्याच्या काळात सोयाबीनच्या बाजारभावात 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत ब्राझील या प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रात सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होणार असा अंदाज होता.
परंतु ब्राझीलमध्ये देखील यावर्षी कमी पाऊस बरसला असल्याने तेथील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यांमध्ये उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. यंदा तिथेही कमी पर्जन्यमान आहे. यामुळे ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घटणार असा अंदाज आहे. हेच कारण आहे की जागतिक बाजारात सोयापेंडचे दर वाढले आहेत. यामुळे अमेरिकेच्या सोयाबीनला देखील आता उठाव वाढला आहे.
याचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात सोयापेंडचे दर 20 टक्क्यांनी आणि सोयाबीनचे दर दहा टक्क्यांनी वाढले आहेत. पण अमेरिकेच्या सोयापेंडपेक्षा आपले भारताचे सोयापेंड अजूनही महाग आहे. मात्र आशिया खंडातील देशांना भारताचे सोयापेंड अमेरिकेपेक्षा स्वस्त पडते. हेच कारण आहे की आशिया खंडात अजूनही आपल्या देशातील सोयापेंडची मागणी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील निर्यातदारांनी आतापर्यंत तीन लाख टन सोयापेंड निर्यातीचे सौदे केले आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात या सौद्याअंतर्गत मालाची निर्यात होणार आहे. दरम्यान ही सर्व परिस्थिती पाहता गेल्या दोन आठवड्यांपूर्वी 4400 ते 4500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी बाजारभावात विक्री होणारे सोयाबीन 4600 ते 4800 रुपयापर्यंत पोहोचले आहेत.
म्हणजेच सरासरी बाजार भाव फक्त दोन आठवड्याच्या काळात तीनशे रुपयांपर्यंत वाढले आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान बाजारात अभ्यासकांनी आगामी काळात जागतिक बाजारात सोयापेंडचे दर वाढतील असे सांगितले जात आहे. याचा परिणाम म्हणून भारतातील सोया पेंडला देखील मागणी वाढणार आहे.
यामुळे साहजिकच प्रक्रिया प्लांट्स मध्ये सोयाबीनची मागणी वाढेल. यामुळे आगामी काळात भाव वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर सोयाबीनचे दर वाढतील असे काही अभ्यासकांनी सांगितले आहे. सोयाबीनचे बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज यावेळी बाजार अभ्यासकांनी वर्तवला आहे.