Soybean Farming : गेल्या काही दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरू आहे. काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे.
या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके संकटात आली आहेत. मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही जिल्ह्यात सोयाबीन पीक पिवळ पडत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाच्या शेतात पाणी साचले आहे आणि यामुळे पिकावर रोगराई पसरली आहे. सध्या सोयाबीन पीक रोपावस्थेत असून या अवस्थेत पीक पिवळे पडले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीन पीक पिवळे पडण्याचे कारण काय? आणि यावर कोणत्या उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्या पाहिजेत याबाबत कृषी विद्यापीठाने दिलेला सल्ला थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीन पीक पिवळे पडण्याचे कारण?
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकात लोह अर्थातच फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिक पिवळे पडते. याला क्लोरोसिस असे म्हणतात. ही एक शारीरिक विकृती आहे.
सोयाबीन पीक पिवळे पडल्यामुळे पिकाची वाढ खुंटते. साहजिकच यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती असते. यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडल्यास लवकरात लवकर उपाययोजना करणे जरुरीचे राहते.
काय उपाय करणार
सर्वप्रथम जर पिकात पाणी साचले असेल तर ते पाणी काढण्याची व्यवस्था करावी. पिकात वाफसा कंडीशन तयार करणे आवश्यक आहे. मग 0.5 टक्के फेरस सल्फेटची 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
किंवा मग ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करण्याचा सल्ला यावेळी कृषी तज्ञांनी दिला आहे. सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर या दोन पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय वापरून पिकाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले जाऊ शकते.