Soybean Farming : भारतीय हवामान विभागाने नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे येत्या दोन दिवसात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. मान्सून सक्रिय होईल आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल असा दावा हवामान विभागाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. विशेष बाब अशी की, 23 जून पासून पावसाला सुरुवात होणार असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
साहजिकच यामुळे आता शेतशिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढणार आहे. पीक पेरणीसाठी शेतकरी बांधव आता पुढे सरसावणार आहेत. यामध्ये सोयाबीन या नगदी पिकाची यावर्षीही मोठ्या प्रमाणात पेरणी होईल असा अंदाज आहे. खरंतर सोयाबीन हे एक नगदी पीक आहे. यातून शेतकऱ्यांना निश्चितच शाश्वत उत्पादन मिळते.
मात्र इतर कोणत्याही पिकाप्रमाणेच सोयाबीनच्या पिकाला देखील विविध रोगांचा आणि कीटकांचा धोका असतो. रोगराईमुळे आणि कीटकांमुळे सोयाबीन पिकातून मिळणारे उत्पादन कमी होते. सोयाबीन पिकावर प्रामुख्याने यलो मोझॅक हा रोग आढळून येतो. या रोगामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
यंदा देखील या रोगाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पेरणी पासूनच शेतकऱ्यांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान आज आपण या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बांधव काय-काय उपाययोजना करू शकतात या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
येलो मोझॅक रोगावर असे मिळवा नियंत्रण
या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पीक व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका निभावते. तज्ञ लोक सांगतात की हा रोग पिकावर येऊ नये यासाठी पिकामध्ये तन वाढू देऊ नये. तन नियंत्रण वेळेतच केले गेले पाहिजे.
तसेच, रोगाची लक्षणे दिसताच रोगाने बाधित असलेली झाडे उपटून नष्ट केली पाहिजेत.
हा रोग खरतर पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. यामुळे या कीटकावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. यासाठी पेरणी करताना बियाण्यावर बीजप्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. थायोमेथॉक्सम 30% एफएस @ 10 मिली/किलो बियाणे किंवा इमिडाक्लोरोप्रिड 48 एफएस @ 1.25 मिली/किलो बियाणे प्रमाणात औषध घेऊन उपचार करणे आवश्यक आहे.
तसेच सोयाबीनची पेरणी वेळेत करणे जरुरीचे आहे. सोयाबीन पेरणी ही 20 जून पासून ते पाच जुलै पर्यंत केली गेली पाहिजे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ते 23 जुलै नंतर सोयाबीनची पेरणी करणे शेतकऱ्यांनी टाळले पाहिजे.
तसेच पांढरी माशीसाठी प्रति हेक्टर 15 ते 20 पिवळे चिकट सापळे बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच सोयाबीनचे पीक 35 दिवसाचे झाल्यावर थायमेथॉक्सम 25 डब्ल्यूजी 100 ग्रॅम/हे. किंवा imidacloprid 17.8 sl. 600 मिली/हेक्टर या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. तसेच या रोगाच्या नियंत्रणासाठी बीटासायलोथ्रीन 8.49 टक्के, इमिडाक्लोरोप्रिड 19.8 टक्के 350 मिली/हे. या प्रमाणात घेऊन फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकावर फवारणी करण्यापूर्वी मात्र तज्ञ लोकांचा सल्ला तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे. येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही.