Soybean Market 2023 : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील सोयाबीन बाजाराचा मूड पूर्णपणे बदलला असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी राज्यातील जवळपास सर्वच बाजारात सोयाबीनचे दर पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आत होते.
त्यामुळे पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागले होते. बाजारभाव दबावात असल्याने पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढायचा हा मोठा सवाल शेतकऱ्यांपुढे होता.
तसेच शेतकऱ्यांना सणासाठी पैशांची गरज होती. यामुळे दिवाळीपूर्वी अनेक बाजारात हमीभावापेक्षा कमी दर असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करावी लागली होती.
त्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वास्तविक, राज्यातील मराठवाडा, विदर्भ, महाराष्ट्र आणि खानदेश या चारही विभागात सोयाबीनची कमी-अधिक प्रमाणात लागवड होते.
एकूणच काय की, राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन या पिकावर अवलंबित्व आहे. परिणामी, सोयाबीन बाजारातील तेजी किंवा मंदी राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न ठरवत असते. सोयाबीनचा हंगाम तेजीत राहिला तरच राज्यातील शेतकऱ्यांना शेतीमधून बऱ्यापैकी उत्पन्न मिळते.
अशातच आता जवळपास एका वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सोयाबीन बाजार भावात सुधारणा पाहायला मिळाली आहे. सोयाबीनचे दर दिवाळीनंतर हळूहळू वाढू लागले आहेत. भावात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील समाधान पायाला मिळत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध बाजारांमध्ये सोयाबीनचे दर हळूहळू वाढू लागले आहेत. आज सुद्धा राज्यातील बहुतांशी बाजारात सोयाबीनच्या दरात चांगल्यापैकी सुधारणा झाली.
आज राज्यातील विविध बाजारात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक सरासरी भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे कमाल बाजारभाव आता साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचले आहेत.
कुठे मिळाला विक्रमी भाव
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, त्यातील चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज अर्थातच 18 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या लिलावात सोयाबीनला किमान 4700 रुपये प्रति क्विंटल, कमाल पाच हजार 321 आणि सरासरी पाच हजार दहा रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
तथापि, सोयाबीनला किमान 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. म्हणून आता शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार बाजारभावात वाढ होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.