Thane News : मुंबई शहर आणि मुंबई महानगर क्षेत्रात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए कडून उड्डाणंपूल, भुयारीमार्ग, सागरी मार्ग असे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
यातच कल्याण-डोंबिवलीकरांना लवकरात लवकर ठाणे तसेच मुंबई गाठता यावे यासाठी एका ब्रिजची उभारणी केली जात आहे. एम एम आर डी ए कडून हा पूल बांधला जात आहे. कल्याण-डोंबिवली आणि ठाणे तसेच मुंबई दरम्यानचा प्रवास गतिमान करण्यासाठी एम एम आर डी ए ने उल्हास खाडीवर पूल प्रस्तावित केला असून सध्या पुलाचे काम सुरू आहे.
हा पूल उल्हास खाडीवर मानकोली ते मोठा गाव दरम्यान विकसित केला जात आहे. या पुलाचे काम सुरुवातीच्या टप्प्यात रखडले होते पण मग खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानंतर आणि पाठपुराव्यानंतर या पुलाचे काम जलद गतीने सुरू झाले आणि आता हा पूल अंतिम टप्प्यात आला आहे.
दरम्यान आता या पुलाबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा पुल आता लवकरात लवकर प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. या पुलाची नुकतीच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना दिल्या आहेत.
यामुळे आता हा पूल लवकरच नागरिकांसाठी खुला होणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या दोन महिन्यात हा पुल नागरिकांसाठी खुला होईल असा दावा एमएमआरडीएच्या काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. दरम्यान, हा पूल सुरू झाल्यानंतर डोंबिवली ते ठाणे प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होणार आहे.
सध्या डोंबिवली ते ठाणे हा प्रवास करण्यासाठी दीड तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे मात्र हा पूल सुरू झाला तर हा प्रवास केवळ 20 ते 30 मिनिटात शक्य होणार आहे. आम्ही आपल्या माहितीस्तव येताना नमूद करू इच्छितो की, माणकोली ते मोठागावपर्यंत पूल बांधण्यासाठी 2013 मध्येच प्रस्ताव मांडण्यात आला होता.
मात्र, या प्रकल्पासाठी सुरुवातीच्या टप्प्यात विविध अडचणी आल्यात. विशेषता भूसंपादन प्रक्रियेसाठी अडचणी आल्यात. यामुळे या प्रकल्पाचे काम सप्टेंबर 2016 मध्ये सुरू करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत उल्हास नदीवर 1225 मीटर लांब व 27.5 मीटर रुंद पूल तयार केला जात आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील दोन महिन्यात हा पूल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.