Vande Bharat Express : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो लोकांसाठी भारतीय रेल्वे लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. तो म्हणजे आता भारतीय रेल्वेची आन-बान-शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने स्वस्तात प्रवास करता येणार आहे. यासाठी रेल्वेने एक खास प्लॅन तयार केला आहे.
खरंतर वंदे भारत एक्सप्रेस 2019 मध्ये सुरू झाली. या गाडीचा वेग हा इतर एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत खूप अधिक आहे. या गाडीचा कमाल वेग 160 किलोमीटर प्रति तास एवढा असून देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सध्या स्थितीला सुरू आहे. आतापर्यंत देशातील 25 मार्गांवर ही गाडी सुरु करण्यात आली आहे.
या गाडीमध्ये देण्यात आलेल्या वर्ल्ड क्लास सोयीसुविधा प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहेत. या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान आणि आरामदायी झाला आहे. त्यामुळे ही गाडी कमी दिवसातच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली. मात्र वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर हे इतर गाड्यांच्या तुलनेत खूप अधिक आहेत.
यामुळे ही गाडी केवळ श्रीमंतांसाठी सुरू करण्यात आली असा आरोप प्रवाशांच्या माध्यमातून केला जात आहे. मात्र आता भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास सर्वसामान्यांना देखील करता यावा यासाठी मोठा निर्णय घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता एसी वंदे भारत एक्सप्रेस च्या धरतीवर नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत.
या नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसमुळे कमी भाड्यात रेल्वे प्रवाशांना प्रवास करता येणे शक्य होणार आहे. ही नॉन एसी वंदे भारत ऑक्टोबर महिन्यापासून प्रवासी सेवेत दाखल होणार असा दावा देखील केला जात आहे.
विशेष बाब अशी की या चालू वर्षात म्हणजेच 2023 मध्ये दोन नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या नवीन गाड्या आयसीएफ चेन्नई येथे तयार केल्या जाणार आहेत. ही नव्याने तयार केली जाणारी नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि स्वस्तात प्रवास करता यावा यासाठी तयार केली जाणार आहे.
कशी असणार नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस
मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या एसी वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा नवीन नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसच्या बाह्यरचनेत बदल राहणार आहे. मात्र प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सर्व सोयीसुविधा सारख्याच राहणार आहेत. या नव्याने दाखल होणाऱ्या गाडीचा स्पीड मात्र कमी राहणार आहे. नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल स्पीड 130 किलोमीटर प्रति तास एवढा राहणार आहे.
साहजिकच सध्या सुरू असलेल्या गाड्यांपेक्षा या गाडीचा स्पीड कमी असेल. या नवीन गाड्यांमध्ये फायर अलार्म सिस्टीम, इमर्जन्सी अलार्म राहतील आणि या नवीन गाड्यांमधील टॉयलेट देखील वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणे हायटेक असणार आहेत.दोन डब्यांमध्ये जर्क-फ्री प्रवास करण्यासाठी सुधारित कपलर देखील राहतील आणि या ट्रेनला एलएचबी कोच बसवले जातील अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.