Vande Bharat Express : भारतात प्रवासासाठी रेल्वे आणि विमान प्रवासाला सर्वात जलद मानले जाते. सर्वसामान्य मात्र रेल्वेच्या प्रवासाला पसंती दाखवतात. याचे कारणही तसे खासच आहे. भारतात रेल्वेचा प्रवास हा इतर प्रवासी सुविधांच्या तुलनेत स्वस्त आहे. यामुळे मध्यमवर्गीय लोक नेहमीच रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करण्यास पसंती दाखवतात. भारतीय नेहमीच बचतीवर लक्ष केंद्रित करतात.
पैसे वाचवण्यासाठी भारतीय लोकांची धडपड असते. म्हणून स्वस्तात आणि जलद गतीने रेल्वेचा प्रवास होत असल्याने भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतात जवळपास 15000 ट्रेन धावत आहेत. भारतातील रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक मोठे नेटवर्क म्हणून ओळखले जाते.
भारतात कदाचित असा एखादाच भाग किंवा प्रदेश असेल जिथे रेल्वे पोहोचलेली नाही. नाहीतर जवळपास सर्वत्र भारतीय रेल्वेचे जाळे पोहचले आहे. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वे सारखा दुसरा चांगला पर्यायच नाही. मात्र लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणारी ही रेल्वे बनवण्यासाठी भारतीय रेल्वेला किती पैसा खर्च करावा लागतो.
याचा कधी तुम्ही विचार केलाय का? कदाचित तुम्ही याबाबत विचार केलेला नसेल. पण जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल तर आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. आज आपण सामान्य रेल्वे बनवण्यासाठी किती खर्च येतो? वंदे भारत ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो? याबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो?
जसं की आपणास ठाऊकच आहे की, एका ट्रेनमध्ये विविध कोच असतात. यामध्ये जनरल, एसी आणि स्लीपर कोचचा समावेश होतो. जनरल कोच बनवण्यासाठी एक कोटी रुपये, एसी कोच बनवण्यासाठी दोन कोटी रुपये आणि स्लीपर कोच बनवण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च होतो. तसेच इंजिन बनवण्यासाठी 18 ते 20 कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो.
अशा पद्धतीने जर 24 डब्यांची एक पूर्ण ट्रेन बनवायची असेल तर भारतीय रेल्वेला 60 ते 70 कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. खरंतर, वेगवेगळ्या ट्रेन बनवण्यासाठी केला जाणारा खर्च हा वेगळा आहे. म्हणजे ट्रेनच्या प्रकारानुसार खर्चात कमी-अधिक होऊ शकते. यात 20 डब्बे असलेली मेमु ट्रेन बनवण्यासाठी 30 कोटींचा खर्च होतो. 25 डब्बे असलेली कालका मेल बनवण्यासाठी चाळीस कोटींपेक्षा अधिकचा खर्च येतो.
21 डबे असलेली हावडा राजधानी ट्रेन बनवण्यासाठी जवळपास 61 कोटी 50 लाखापर्यंतचा खर्च येतो. 18 डब्बे असलेली अमृतसर शताब्दी ट्रेन बनवण्यासाठी 60 कोटी रुपयांचा खर्च येतो. या खर्चामध्ये इंजिनचा देखील समावेश आहे. एकंदरीत सामान्य ट्रेन बनवण्यासाठी 60 ते 70 कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र वंदे भारत ट्रेन बनवण्यासाठी जवळपास 110 ते 120 कोटी रुपयांचा खर्च भारतीय रेल्वे करत आहे. अर्थातच सामान्य ट्रेनच्या तुलनेत जवळपास दुप्पट खर्च वंदे भारत ट्रेन बनवण्यासाठी लागतो.