Viral Agriculture News : यंदा महाराष्ट्र जवळपास दुष्काळाचा उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे मात्र ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महिनाभर पाऊस पडला नसल्याने सध्याचा पाऊसही ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढणार का हा प्रश्न अजूनही कायमच आहे.
खरंतर हे नैसर्गिक संकट पहिल्यांदाच आले आहे असे नाही. याआधी देखील अशा संकटांचा बळीराजाला सामना करावा लागला आहे. मात्र आता दुष्काळी परिस्थितीवर शेतकऱ्यांना यशस्वीरित्या मात करता येणार आहे. कारण की जळगावच्या एका शेतकरी पुत्राने अशी एक पावडर तयार केली आहे ज्याच्या मदतीने दोन महिने पिकाला पाणी भरले नाही तरीही पीक जगू शकणार आहे.
हो बरोबर वाचताय तुम्ही जळगावच्या शेतकरी लेकाने असं संशोधन केलं आहे. विशेष म्हणजे जळगावच्या या लेकाच्या संशोधनाची भुरळ राज्याच्या कृषिमंत्र्यांना आणि राज्य सरकारला देखील पडली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या संशोधनाची आता दखल घेतली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे ब्राह्मण शेवगे येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले सुनील पवार यांनी ही किमया साधली आहे. पवार स्वतः शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांना शेतकऱ्यांच्या अडीअडचणी चांगल्याच ठाऊक आहेत. विशेष म्हणजे खानदेशमध्ये देखील अनेकदा पावसाचे असमान वितरण पाहायला मिळते. मराठवाड्याप्रमाणेच खानदेशातील काही भागात देखील नेहमीच दुष्काळी परिस्थिती अनुभवयाला मिळते.
यामुळे पवार यांना दुष्काळात शेतकऱ्यांचे किती नुकसान होते याची चांगलीच कल्पना आहे. हेच कारण आहे की त्यांनी पिकाला दुष्काळी परिस्थिती असताना पाणी मिळाले नाही तरीदेखील पीक मरू नये यासाठी संशोधन केले आहे. त्यांनी संशोधन करून एक विशिष्ट जैविक पावडर तयार केली आहे.
पवार सांगतात की ही जैविक पावडर ज्यावेळी शेतकरी बांधव पेरणी करतात त्यावेळी बियाण्यासोबत मिक्स करून लावली तर पिकाला दीड ते दोन महिने पाण्याची गरजच भासत नाही. यामुळे यंदा जशी दुष्काळी परिस्थिती आहे तशा दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हे संशोधन मोलाचे योगदान देणार असल्याचा दावा केला जात आहे.
विशेष बाब अशी की याचे पेटंट आता सुनील पवार यांना मिळाले आहे. यामुळे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या संशोधनाबाबत पवार यांच्याशी फोनवर चर्चा करून अधिक माहिती घेतली आहे. एवढेच नाही तर पुढील आठवड्यात कृषी विद्यापीठातील तज्ञांची एक टीम जळगाव जिल्ह्यात जाऊन पवार यांच्या संशोधनाबाबत अधिक सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत.
शिवाय त्यांनी या संशोधनाचा ज्या शेतात वापर केला आहे त्या शेताचा अभ्यास देखील या तज्ञ मंडळींकडून केला जाणार आहे. मका व अनेक दिवस आपल्यात पाणी साठवून ठेवणाऱ्या काही जैविक घटकांचा वापर करून पवार यांनी ही पावडर तयार केली आहे. या पावडर मध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेले जैविक घटक असल्याने पिकाला दोन महिने जरी पाणी दिले नाही तरीदेखील पीक तग धरू शकते असे सांगितले जात आहे.
दरम्यान मुंडे यांनी हे संशोधन पूर्णपणे यशस्वी झाले तर कृषी क्षेत्रात एक क्रांती होईल असे प्रतिपादन यावेळी केले आहे. तसेच याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी लवकरच कृषी विद्यापीठातील तज्ञांची एक टीम चाळीसगाव येथील ब्राह्मण शेवगेला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संशोधनाबाबत पुढे योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली आहे.