Wheat Farming : राज्यातील शेतकरी बांधव सध्या रब्बी हंगामातील पिकांसाठी पूर्व मशागतीची कामे करत आहेत. आपल्या परिवारासमवेत सध्या शेतकरीबांधव शेत शिवारात रब्बीसाठी धावपळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या रब्बी हंगामात मान्सून काळात कमी पाऊस बरसला असल्याने मोठ्या प्रमाणात पेरा घटण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने गव्हाची लागवड कमी होईल असा अंदाज आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता आहे आणि जिथे मान्सून काळात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे तिथे मात्र गव्हाची पेरणी यंदा देखील होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी गव्हाच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. खरंतर गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी आणि अन्नधान्य पीक आहे. गव्हाची वेळेवर लागवड एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान केली जाते.
तसेच काही शेतकरी बांधव गव्हाची उशिराने देखील लागवड करतात. 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत गव्हाची उशिराने पेरणी केली जाऊ शकते. पण उशिराने गहू लागवड केली म्हणजेच उत्पादनात घट येणार म्हणजे येणार. यामुळे उशिराने गहू लागवड करण्याऐवजी वेळेवर गहू लागवड करावी असा सल्ला तज्ञ लोक घेत असतात. वेळेवर गहू लागवड केली तर वाढत्या तापमानाचा पिकाव विपरीत परिणाम होत नाही आणि वेळेत चांगले उत्पादन पिकातून मिळवता येते. आता आपण गव्हाच्या सुधारित जाती जाणून घेणार आहोत.
गव्हाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
लोकवण : गव्हाचा हा एक सुधारित वाण आहे मात्र या वाणाचे बियाणे तुम्हाला मिळणार नाही. कारण की सरकारने हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी बॅन केला आहे. मात्र गव्हाच्या या जातीचे बियाणे काही शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. यामुळे आजही लोकवण वाणाची राज्यात लागवड पाहायला मिळते.
लोकवन जातींचे गहू हे विशेषतः पुरणपोळी बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. इतर कोणत्याही जातीच्या गव्हापासून चांगली पुरणपोळी बनू शकत नाही. मात्र या जातीच्या गव्हापासून खूपच उत्कृष्ट पुरणपोळी बनत असते. यामुळे या जातीच्या गव्हाला बाजारात खूप मोठी मागणी असते. या जातीच्या गव्हाला बाजारात चांगला भावही मिळतो.
कल्याण सोना : हा देखील गव्हाचा एक सुधारित वाण आहे. परंतु या जातीच्या गव्हाचे बियाणे देखील विक्रीसाठी उपलब्ध नाहीये. शेतकऱ्यांकडे मात्र या जातीच्या गव्हाचे बियाणे मिळू शकते. या जातीचा गहू हा चपातीसाठी सर्वोत्कृष्ट असतो. यापासून चांगले उत्पादनही मिळते.
अजित 102 : या जातीचे गव्हाचे बियाणे तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार आहे. हा गव्हाचा सुधारित वाण असून यापासून एकरी 22 ते 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. गव्हाचा हा वाण 110 ते 120 दिवसात तयार होतो.
याशिवाय गव्हाच्या अजय 72, अंकुर केदार, Mhyco मुकुट, श्रीराम 111 या गव्हाच्या जाती देखील सर्वोत्कृष्ट आहे. या जातींपासून देखील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.