Wheat Farming : सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. सोयाबीन, कापूस तसेच मका, मूग यांसारख्या विविध पिकांच्या हार्वेस्टिंगला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाच्या कमतरतेमुळे राज्यातील विविध भागात सोयाबीन, कापूस, मूग मका या पिकांच्या उत्पादनात घट आली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत आहेत.
दरम्यान आता खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई रब्बी हंगामातून भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे यावर्षी रब्बी हंगामात गहू या अन्नधान्य पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. खरंतर एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान गव्हाची वेळेवर पेरणी होणार आहे.
तत्पूर्वी जमिनीची मशागत केली जाणार आहे. मात्र गव्हाच्या पिकातून जर यंदा चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी गव्हाच्या बियाण्यावर बीजोपचार करणे जरुरीचे आहे. दरम्यान आता आपण गव्हाच्या बियाण्यावर कशा पद्धतीने बिजोपचार केले पाहिजेत याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कशी करणार बीज प्रक्रिया ?
कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना गहू पेरणी करण्यापूर्वी बियाण्यावर बीजो उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी थायरम ७५% डब्ल्यु. एस. या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रीया करण्यास सांगितले आहे.
तसेच जर गव्हाच्या पिकावर मावा, तुडतुडे आणि खोडमाशी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असेल तर याच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम ३०% एफ. एस या कीटकनाशकाची ७.५ मिली प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करण्याचा सल्ला यावेळी तज्ञांनी दिला आहे.
एवढेच नाही तर या बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकाचची बीजप्रक्रिया झाल्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू खतांची बीजप्रक्रिया केली पाहिजे असे मतही तज्ञांनी व्यक्त केले आहे. कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जिवाणू खताची बीजप्रक्रिया बियाण्यावर झाली तर यामुळे उत्पादनात 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचा दावा केला जात आहे.