Wheat Farming : गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा हा लेख खूपच खास राहणार आहे. गहू हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वचं जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात उत्पादित केले जाते.
यंदा मात्र कमी पावसामुळे गहू लागवडीखालील क्षेत्र थोडेसे कमी झाले आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे पुरेशी पाण्याची व्यवस्था होती त्या शेतकऱ्यांनी यंदाही या पिकाची पेरणी केली आहे.
दरम्यान, उत्पादकांच्या माध्यमातून सातत्याने गव्हाच्या पिकाला मॅग्नेशियम दिले पाहिजे का, मॅग्नेशियमच्या कमतरतेचे लक्षणे नेमके काय असतात, मॅग्नेशियमचा वापर कसा केला पाहिजे यांसारखे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. यामुळे आज आपण या सर्व प्रश्नांची थोडक्यात उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गव्हाच्या पिकात मॅग्नेशियम वापरावे का?
गव्हाच्या पिकात मॅग्नेशियम वापरावे का तुमचाही असाच प्रश्न असेल तर याचे उत्तर आहे हो. पिकाला जशी झिंक आणि सल्फरची गरज भासत असते. त्याचप्रमाणे पिकाच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी मॅग्नेशियम देखील लागत असते. मॅग्नेशियम दुय्यम पोषक तत्वांमध्ये येते. जरी वनस्पतीला ते कमी प्रमाणात आवश्यक असले तरी ते पिकाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
अंकुर फुटण्यापासून ते पीक हिरवे करण्यापर्यंतची अनेक कार्ये मॅग्नेशियमद्वारे केली जातात. मॅग्नेशियम सल्फेट या नावाने तुम्हाला बाजारात मॅग्नेशियम मिळते. यात मॅग्नेशियम आणि सल्फर आढळते. त्यात मॅग्नेशियमचे प्रमाण 9.5% आणि सल्फरचे प्रमाण 12% असते.
मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पिकाची खालील पाने पिवळी पडतात. पिकाची पाने जर पिवळी पडली तर पिकाची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. पिकाची जर चांगली जोमदार वाढ झाली नाही तर साहजिकच उत्पादनात मोठी घट येत असते. यामुळे जर गव्हाची खालील पाने पिवळी पडलेली असतील तर मॅग्नेशियमची कमतरता आहे असे समजावे आणि वेळीच मॅग्नेशियमची गरज भागवली पाहिजे.
मॅग्नेशियम किती प्रमाणात दिले पाहिजे
मॅग्नेशियमचा वापर हा सॉईल टेस्टिंग अर्थातच माती परीक्षण केल्यानंतरच करावा. सोईल टेस्टिंग मध्ये मॅग्नेशियमची कमतरता आढळल्यास मॅग्नेशियमचा वापर केला पाहिजे.
जर सोईल टेस्टिंग मध्ये मॅग्नेशियमची कमतरता नसेल तर याचा मुळीच वापर करू नये. कृषी तज्ञ सांगतात की ज्या जमिनीचा पीएच सहा पेक्षा कमी असतो त्या ठिकाणी मॅग्नेशियमची कमतरता आढळते.
जर पिकात मॅग्नेशियमची कमतरता आढळली तर तुम्ही जमिनीतून किंवा फवारणीद्वारे पिकाला मॅग्नेशियम देऊ शकता. जमिनीतून मॅग्नेशियम सल्फेट वापरायचे असल्यास तुम्हाला प्रति एकर 10 किलो मात्रा लागणार आहे.
जर तुम्ही स्प्रेद्वारे म्हणजेच फवारणी द्वारे मॅग्नेशियम देत असाल तर तुम्हाला एकरी 1 किलोग्राम प्रमाण वापरावे लागणार आहे. तुम्ही युरिया आणि इतर खतांसोबतही मॅग्नेशियम वापरू शकता.