LPG ग्राहकांसाठी मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय !! ग्राहकांना कोण-कोणते फायदे मिळणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. निवडणुकीचे पडघम मात्र आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच वाजू लागले होते. केंद्रातील मोदी सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासूनच विविध निर्णय घेतलेत. एलपीजी ग्राहकांसाठी देखील काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत.

गेल्या वर्षात अन या चालु वर्षात एलपीजी ग्राहकांसाठी तीन मोठे निर्णय घेतले गेले आहेत. दरम्यान आता आपण हे तीन निर्णय कोणते आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत. तसेच या निर्णयाचा सर्वसामान्यांना कसा फायदा होणार हे देखील पाहणार आहोत.

ऑक्टोबर 2023 मध्ये घेतला हा मोठा निर्णय

सरकारने ऑक्टोबर 2023 मध्ये घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला. उज्वला योजनेचा लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली. ऑक्टोबर 2023 च्या आधी उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त दोनशे रुपये सबसिडी मिळत होती.

मात्र सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये मोठा निर्णय घेतला आणि या सबसिडीच्या रकमेत शंभर रुपयांची वाढ केली आहे. यानुसार, आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरसाठी तीनशे रुपये सबसिडी मिळणार आहे. एका वर्षात बारा सिलेंडरवर या सबसिडीचा लाभ मिळणार आहे.

गॅस सिलेंडरच्या किमतीत झाली कपात 

गेल्या मार्च महिन्यात मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी झाल्या आहेत. आठ मार्च 2024 ला केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती शंभर रुपयांनी कमी केल्या असून आता गॅस सिलेंडर 802.50 रुपयांना मिळत आहे.

आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेऊन एक मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे. याचा सरकारला आगामी निवडणुकीत फायदा होतो की नाही हे तर येणारा काळच सांगणार आहे मात्र या निमित्ताने आगामी काही दिवस का होईना पण सर्वसामान्यांना दिलासा मिळेल एवढे नक्की.

सबसिडी योजनेला मुदत वाढ 

उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीच्या योजनेला मुदतवाढ देण्याचा देखील निर्णय सरकारने घेतला आहे. ही सबसिडीची योजना 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार होती. पण सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता ही सबसिडीची योजना 31 मार्च 2025 पर्यंत चालू राहणार आहे.

आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला 12 सिलेंडर अनुदानावर मिळणार आहे. प्रति सिलेंडर 300 रुपये एवढे अनुदान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळू शकणार आहे. याबाबतचा निर्णय गेल्या मार्च महिन्यातच घेतला गेला आहे.

दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरवर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीला एका वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याने यामुळे सरकारला बारा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. तसेच याचा देशातील दहा कोटी कुटुंबांना फायदा होणार असे सांगितले जात आहे.

विशेष बाब अशी की, गेल्या सात महिन्यांमध्ये केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवलेल्या नाहीयेत. यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत असा दावा सरकार करत आहे. पण हे अच्छे दिन निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ही कायम राहणार का ही पाहण्यासारखी गोष्ट राहणार आहे.

Leave a Comment