Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात आता लवकरच जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. खरंतर गेल्या जुलै महिन्यात राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र म्हणजेच सर्वत्र जोरदार पाऊस झाला.
जून महिन्यात सुट्टीवर गेलेला पाऊस जुलै महिन्यात जोरदार बरसला. गेल्या महिन्यातील पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. पण आता गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातून पाऊस गायब झाला आहे. पावसाने उसंत घेतली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील कोकणात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे मात्र मुसळधार पाऊस तिथेही होत नाहीये.
पण आता हवामानात मोठा बदल होत आहे. आता राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. हवामान खात्याने या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता राज्यात 18 तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
18 ते 24 ऑगस्ट दरम्यान राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या विभागातील अनेक जिल्ह्यात पाऊस होणार असा अंदाज आहे. तसेच 25 ऑगस्ट पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत राज्यातील कोंकण आणि विदर्भात पाऊस पडणार असे सांगितले जात आहे. या कालावधीत मात्र मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सरासरी इतका किंवा त्याहीपेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये 17 ऑगस्टपर्यंत अत्यल्प पाऊस राहणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत राज्यात 18 ऑगस्ट पासून पावसाला सुरुवात होणार आहे. परंतु या कालावधीत पडणारा पाऊस हा जुलै महिन्याप्रमाणे जोरदार राहणार नाही. परंतु मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असे काही हवामान तज्ञांच्या माध्यमातून सांगितले जात आहे.