Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली असल्याने राज्यात दुष्काळाचे सावट अधिकच गडद होत चालले आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्र धास्तावलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑगस्ट महिन्यात 56% कमी पाऊस पडला आहे.
यामुळे खरीप हंगामातील पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. कापूस, सोयाबीन ही खरिपातील मुख्य पिके कमी पाण्यामुळे वाया जाणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशातच विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा अशी महत्त्वाची मागणी केली आहे.
भर पावसाळ्यात पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असल्याने राज्यावर पाणी संकट निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी देखील राज्यातील नागरिकांना भटकंती करावी लागणार असे चित्र तयार होत आहे. राज्यातील कोकण विभाग वगळता सर्वत्र दुष्काळाचे मलभ दाट होत आहे.
अशा स्थितीत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मोठी मागणी केली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट दिले आहे. खरंतर, मान्सूनचा आणखी दीड महिना बाकी आहे.
या दीड महिन्यात जर समाधानकारक पाऊस झाला तर किमान पिण्यासाठी तरी पाण्याची सोय होणार आहे. यामुळे शेतकरी सध्या देव नवसत आहेत. देवाकडे पावसासाठी विनवणी केली जात आहे. दरम्यान आता देव शेतकऱ्यांचे हे गाऱ्हाणे ऐकणार असे सांगितले जात आहे.
कारण की, राज्यात लवकरच मोठा पाऊस होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभाग दर गुरुवारी पुढील चार आठवड्यांचा हवामान अंदाज देत असते. या गुरुवारी देखील हवामान विभागाने आपला दीर्घकालीन अंदाज वर्तवला आहे.
यात राज्यात आठ सप्टेंबर नंतर मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD ने महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमीच राहणार अशी शक्यता वर्तवली आहे. पण 8 सप्टेंबर नंतर राज्यात मोठ्या पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल आणि जोरदार पाऊस बसेल असा अंदाज आहे.
विशेषतः राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागात 8 सप्टेंबर नंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो असा अंदाज बांधण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. केएस होसाळीकर यांनी देखील ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडणार अशी आशा व्यक्त केली आहे.
निश्चितच जर हवामान विभागाचा आणि हवामान तज्ञांचा हा अंदाज खरा ठरला तर मान्सूनच्या सरते शेवटी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे खरीप हंगामातील वाया गेलेली पिके पुन्हा उभारी घेतील आणि बऱ्यापैकी उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल असा विश्वास आता व्यक्त केला जात आहे.