Maharashtra Jamin Kharedi : जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. जर तुम्हीही जमीन खरेदी किंवा विक्री करण्याचा विचारात असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी सर्वाधिक खास राहणार आहे. खरंतर जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार हा खूपच किचकट समजला जातो.
जमीन खरेदी-विक्री करतांना खरेदीखत करावे लागते. खरेदीखत हा जमिन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्याचा पुरावा असतो. यामुळे जमिनीचे हे सर्वाधिक महत्त्वाचे दस्तऐवज बनते. मात्र जमीन खरेदी-विक्री करताना आणि खरेदीखत करताना जमीन धारकांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जमिनीचे खरेदीखत करण्यापूर्वी जमीन विकत घेणाऱ्या व्यक्तीकडून जमीन मालकाने व्यवहाराची संपूर्ण रक्कम घेतली पाहिजे आणि त्यानंतर मग जमिनीचे खरेदीखत केले पाहिजे. जर जमीन घेणाऱ्याने संपूर्ण रक्कम जमीन मालकाला दिलेली नसेल तर खरेदीखत करू नये.
कारण की खरेदीखत झाल्यानंतर आधीच्या जमीन मालकाचा अधिकार पूर्णपणे काढून घेतला जातो म्हणजे खरेदी खत पूर्ण झाल्यानंतर आधीच्या मालकाचा मालकी हक्क हा निघून जातो आणि जमीन ही खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर होते. तसेच जमिनीचे खरेदी खत हे सहजासहजी रद्द होत नाही.
जमिनीचे खरेदीखत दुय्यम निबंधक कार्यालयात केले जाते मात्र जेव्हा खरेदीखत रद्द करण्याचा विषय येतो तेव्हा हा विषय दुय्यम निबंधक कार्यालयाअंतर्गत येत नाही. खरेदीखत फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयात रद्द होते. साहजिकच यासाठी पुरावे देखील तेवढे स्ट्रॉंग असणे आवश्यक आहे. यामुळे खरेदीखत करण्यापूर्वी जमिनीचे संपूर्ण पैसे जमीन मालकाने घेणे अपेक्षित आहे आणि त्यानंतरच जमिनीची खरेदीखत प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे.
कशी असते खरेदीखत करण्याची प्रोसेस ?
जमिनीचे खरेदीखत हे दुय्यम निबंधक कार्यालयात होते. ज्या गावातील जमीन असेल त्या संबंधित गावातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खताची प्रोसेस पूर्ण केली जाते. खरेदीखत करण्यापूर्वी मुद्रांक शुल्क भरावे लागते. हे मुद्रांक शुल्क रेडीरेकनरच्या दरानुसार ठरतात.
याबाबतचे दरपत्रक दुय्यम निबंधक कार्यालयात उपलब्ध असते. जमिनीचे मूल्यांकन काढून देण्याचे काम देखील दुय्यम निबंधक कार्यालयाचेच असते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, जमिनीची सरकारी किंमत आणि प्रत्यक्ष जमीन मालक व खरेदीदार यांच्यात झालेल्या व्यवहारात जी रक्कम जास्त असते त्या रकमेवर मुल्यांकन केले जाते. आणि यापैकी जास्तीत जास्त रकमेवर मुद्रांकशुल्क गृहीत धरला जातो.
एकदा मुद्रांक शुल्क काढला की मग दुय्यम निबंधक खरेदी खतासाठी आवश्यक असलेल्या मुद्रांक शुल्काची आणि कागदपत्रांची माहिती संबंधितांना देतात. यानंतर मग सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करून खरेदीखताची प्रोसेस पूर्ण होते. खरेदीखताची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात झाली की जमिनीचा व्यवहार हा पूर्ण होतो. म्हणजेच जमीन विक्रीचा व्यवहार खरेदीखतानंतर संपुष्टात येतो.
खरेदी खताची नोंदणी ही जमीन व्यवहारातील एक महत्त्वाची कडी आहे. हे काम झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच असं म्हणण्यापेक्षा त्या दिवशीच सातबारा नवीन मालकाच्या नावे होतो. मात्र याबाबतची नोंद खरेदी खत झाल्यानंतरच होते. आता आपण जमीन खरेदी खत करताना लागणाऱ्या कागदपत्रांची यादी पाहणार आहोत.
कोणकोणती कागदपत्रे लागतात ?
मिळालेल्या माहितीनुसार, खरेदीखत करताना 1) सातबारा 2) मुद्रांकशुल्क 3) आवश्यक असल्यास फेरफार 4) आठ अ 5) मुद्रांक शुल्काची पावती 6) दोन ओळखीच्या व्यक्ती, त्यांचे फोटो प्रुफ 7) आवश्यक असल्यास प्रतिज्ञापत्र 8) N A order ची प्रत 9) विक्री परवानगीची प्रत या नऊ कागदपत्रांची आवश्यकता भासत असते.