हवामान अंदाज ऑगस्ट : हा महिनाही कोरडा जाणार नाही; राज्यातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert August : जुलै महिन्यात महाराष्ट्राला पावसाने अक्षरशा झोडपून काढले होते. विशेषता जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला. गेल्या महिन्यात राज्यातील अनेक भागात अतीवृष्टी देखील झाली. अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. नद्या नाले दुथडी भरून वाहू लागलेत. नद्यांची पाणी पातळी वाढली यामुळे नदीकाठी वसलेल्या अनेक गावांमध्ये पूर आला.

यामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून पूरस्थिती निवळत चालली आहे. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात अपेक्षित असा पाऊस पडणार नाही असे मत व्यक्त केले. हवामान विभागाने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात हलका पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता मात्र त्यानंतर संपूर्ण महिनाभर पावसाची उघडीप राहणार असा अंदाज होता. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

मात्र आता पुन्हा एकदा राज्यातपाऊस सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल अर्थातच मंगळवारी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

IMD ने सांगितले की, काल म्हणजे मंगळवारी बांगलादेशच्या किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हे कमी दाबाच क्षेत्र आज पश्चिम बंगालमध्ये गंगाखोरे ओलांडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. म्हणजे ही प्रणाली आता पश्चिम आणि वायव्य दिशेकडे सरकत आहे. याचा परिणाम म्हणून बुधवारपासून महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोणत्या भागात पडणार पाऊस?
आज आणि उद्या दक्षिण कोकणातील रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राजधानी मुंबई आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग मध्ये देखील आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. उद्या अर्थातच गुरुवारी उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

तसेच चार ऑगस्ट रोजी या दोन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असा अंदाज असून या दोन्ही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जिल्ह्यात शनिवार पर्यंत पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच कोल्हापूर मध्ये देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात या कालावधीत प्रामुख्याने घाटमाथ्यावर पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

यासोबतच आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यात मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आज मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आहे. उद्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. आगामी काही दिवस विदर्भात ही सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असे आय एम डी ने स्पष्ट केले आहे. मात्र जुलै महिन्यात ज्याप्रमाणे दीर्घकाळ मुसळधार पाऊस पडला तसा पाऊस या चालू ऑगस्ट महिन्यात होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment