Maharashtra Rain : जुलै महिन्यात राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. काही भागात अतिवृष्टी देखील झाली. या अतिवृष्टीमुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
मात्र आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातून पावसाचा जोर ओसरला आहे. याचा परिणाम म्हणून पूरस्थिती देखील निवळत चालली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा हवामान अंदाज समोर आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र असे असले तरी पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आगामी पाच दिवस राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचं मत हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कोकणात प्रामुख्याने दक्षिण कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
याव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. राज्यात उर्वरित भागात केवळ ढगाळ हवामान राहणार आहे. आज पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजधानी मुंबईमध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच आज आणि उद्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत राज्यात आगामी काही दिवस तुरळक ठिकाणी भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.