शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; राज्यातील ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. जून महिन्यात पावसाने मोठा खंड पाडल्यानंतर जुलैमध्ये राज्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. खरंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील पाऊस झाला मात्र हा पाऊस कोकण आणि घाटमाथ्यावरच होता.

राज्यातील उर्वरित भागात पावसाने चांगलीच दडी मारली होती. पण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांशी भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. यानंतर पावसाने तीन चार दिवस विश्रांती घेतली. आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. पण सध्या राज्यात जोरदार पावसाने विश्रांती घेतली असून रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

खरीप हंगामातील पिकांना मात्र जोरदार पावसाची गरज आहे. राज्यातील काही भागात अजूनही शेतात पाणी साचेल असा पाऊस झालेला नाही. रिमझिम पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी पेरणी करून घेतली आहे. यामुळे खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. आता पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे.

दरम्यान आज राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील 21 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आज कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. यासोबतच मराठवाड्यात आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात आज जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असा अंदाज आहे. आता आपण भारतीय हवामान विभागाने आज कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

या जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात विशेषता घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील अकोला, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी आयएमडीने येलो अलर्ट जारी केला आहे.

तसेच आज 16 जुलै रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना देखील आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Leave a Comment