खुशखबर…! राज्यात उन्हाळी कांदा कडाडला, एका दिवसात प्रतिक्विंटल 500 रुपयांची वाढ, कुठं मिळाला सर्वोच्च भाव, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत आहे. बाजारभावात होणारी वाढ राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. कांद्याच्या उत्पादनासाठी जगात ख्याती प्राप्त असलेल्या नाशिक जिल्ह्यात देखील उन्हाळी कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे.

जिल्ह्यात एकाच दिवसात कांद्याच्या बाजारभावात तब्बल 500 रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली असून यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळू लागला आहे. खरंतर जानेवारी 2023 ते जून 2023 या सहा महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांनी खूपच कवडीमोल भावात आपला कांदा विकला आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून कांद्याचे बाजार भाव पुन्हा एकदा पूर्वपदावर आले असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे झळकू लागले आहेत. नासिक जिल्ह्यात काल अर्थातच शुक्रवारी झालेल्या लिलावात उन्हाळी कांद्याला 2200 रुपये प्रति क्विंटल ते 2400 रुपये प्रतिक्विंटल दरम्यानचा भाव मिळाला आहे.

विशेष म्हणजे गुरुवारच्या तुलनेत काल झालेल्या लिलावात बाजारभावात शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली आहे. त्याहून विशेष म्हणजे कालच्या लिलावात आवक वाढूनही बाजारभावात वाढ झाली आहे.

दरवाढ होण्याचे कारण 

निर्यातीपेक्षा देशांतर्गत मागणी वाढल्याने कांद्याच्या बाजारभावात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. सिंगापूर, मलेशियासह आखाती देशांमध्ये पाकिस्तानच्या कांद्याला 80 टक्के पसंती दाखवली जात आहे. तर आपला भारतातील कांदा त्या ठिकाणी केवळ 20 टक्के एवढा निर्यात होत आहे.

पण बांगलादेश आणि श्रीलंकेत आपल्या कांद्याला पसंती असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या देशातून कांदा निर्यात होत आहे. दरम्यान आता फिलिपिन्स लवकरच चीन सोबतच इतर देशांमध्ये कांदा निर्यात करणार अशी माहिती निर्यातदारांच्या हाती आली आहे.

याचाच अर्थ देशातून होणारी कांद्याची निर्यात पुन्हा एकदा प्रभावित होण्याची शक्यता असून यामुळे बाजारभावात कमी येणार अशी शक्यता आहे. मात्र कांद्याच्या बाजारासाठी ही बाब चिंतेची असतानाच काल अचानक बाजारभावात वाढ का झाली? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान देशांतर्गत कांदा मागणी वधारली असल्याने बाजार भावात वाढ झाली आहे, असे जाणकार लोकांनी स्पष्ट केले. तर काही लोकांनी सलग सुट्ट्या आल्याने काल व्यापाऱ्यांनी खरेदी वाढवली असावी आणि याच वाढलेल्या खरेदीमुळे बाजारभावात वाढ झाली असावी अशी शक्यता व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे केंद्राने बफर स्टॉक मधील कांदा बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास तीन लाख मॅट्रिक टन एवढा कांदा बाजारात विक्रीसाठी पाठवला जाणार असून यामुळे कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या राज्यांमध्ये कांद्याचे बाजार भाव जास्त आहेत त्या राज्यांमध्ये केंद्राकडून हा कांदा पाठवला जाणार आहे.

निश्चितच केंद्राचा हा निर्णय कांद्याच्या बाजारभावावर अंकुश लावणारा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या या निर्णयाचा विरोध केला जात असून सरकारविरोधातील शेतकऱ्यांचा रोष हा दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे बाजारात अचानक आलेली ही तेजी आता किती दिवस कायम राहते ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

जिल्ह्यातील कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. या एपीएमसी मध्ये काल 24 हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 2,951 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 2,400 प्रतिक्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला. तसेच किमान भाव ७५० रुपये प्रति क्विंटल एवढा होता.

Leave a Comment