Pm Kisan Yojana Latest News : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली एक अतिशय महत्त्वाची, शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयाचा आर्थिक लाभ दिला जात आहे. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या आर्थिक लाभाचे वितरण केले जात आहे.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एकूण 14 हप्ते मोदी सरकारने दिले आहेत. या योजनेचा 14 वा हप्ता गेल्या महिन्यात, 27 जुलै रोजी राजस्थान येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान देण्यात आला आहे. चौदाव्या हफ्त्याचा लाभ देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांना मिळाला आहे.
चौदाव्या हफ्त्याचा लाभ मिळाला आता पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना केव्हा वितरित होणार? हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान येणारा 15 वा हप्ता हा या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वीच वितरित केला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
अशातच मात्र गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल होणार आणि या योजनेचा पती आणि पत्नी दोघांना लाभ मिळणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत आज आपण याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम किसान योजनेच्या नियमात होणार का बदल?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेचा पती आणि पत्नी दोघेही जण लाभ उचलू शकत नाही. याचा लाभ परिवारातील केवळ एकाच सदस्याला घेता येतो. याचाच अर्थ या योजनेचा लाभ पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकालाच मिळतो.
जर पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत असतील तर अशा पती आणि पत्नी पैकी एका व्यक्तीला अपात्र ठरवले जाईल आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या व्यक्तीकडून हप्त्याची वसुली केली जाईल.
तसेच पती आणि पत्नी दोघांनाही लाभ देण्यासाठी या योजनेच्या नियमात कोणताच बदल करण्यासाठी शासनाकडून सध्या तरी काहीच हालचालं होत नाहीये. याचा प्रस्ताव शासनाकडे सध्या विचाराधीन नाही. यामुळे या योजनेचा एका कुटुंबातील दोन व्यक्तींना लाभ मिळणार नाही हे स्पष्ट होत आहे.
या लोकांनाही लाभ मिळतं नाही
जर शेतकरी कुटुंबात कोणी आयकर भरत असेल तर अशा कुटुंबाला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. याव्यतिरिक्त भाडेतत्त्वावर शेती कसणाऱ्या लोकांना देखील याचा लाभ मिळत नाही. याचा लाभ केवळ शेत जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांना मिळतो.
डॉक्टर, इंजिनीअर, सीए, वास्तुविशारद, वकील अशा व्यावसायिकांनाही या योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच मासिक दहा हजार रुपयांपेक्षा अधिक पेन्शन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जात नाही.