Rabi Onion Farming : यंदाच्या खरीप हंगामावर दुष्काळाचे ढग दाट झाले आहेत. महाराष्ट्र जवळपास दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात अपेक्षित असा पाऊस पडला नसल्याने राज्यात पाणी संकट तयार झाले आहे.
भारतीय हवामान विभागाने मात्र आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे जर सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात चांगला पाऊस झाला तर रब्बी हंगामातील पिकांना यामुळे फायदा मिळेल तसेच सध्याच्या खरीप हंगामातील पिकांच्या वाढीसाठी देखील याचा फायदा होईल असे सांगितले जात आहे.
अशा स्थितीत दरवर्षीप्रमाणेच यंदाही रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होण्याची शक्यता आहे. जर आगामी काळात चांगला मोठा पाऊस झाला तर रब्बी हंगामात कांद्याची लागवड वाढू शकते. दरम्यान आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रब्बी हंगामासाठी शिफारशीत करण्यात आलेल्या कांद्याच्या सुधारित जाती विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत.
रब्बी हंगामातील कांदा लागवड केव्हा केली जाते?
खरंतर भारताच्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आपल्या राज्यात खरीप, लेट खरीप आणि रब्बी हंगामात कांदा लागवड केली जाते. खरीप आणि लेट खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामातील कांदा लागवड अधिक आहे.
रब्बी हंगामातील कांदा लागवड करण्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात रोपवाटिका तयार केली जाते. हि रोपवाटिका डिसेंबर ते जानेवारी महिन्यात पुनरलागवडीसाठी तयार होते. अर्थातच रब्बी हंगामातील कांदा पुनर्लागवड डिसेंबर ते जानेवारी महिन्यात होते.
रब्बी सुधारित जाती
बसवंत 780 : बसवंत 780 या जातीची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या जातीची खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. कांदे आकाराने मध्यम ते मोठे असतात. या जातीची लागवड केल्यानंतर साधारणतः 100 ते 110 दिवसात पीक परिपक्व बनते. यापासून एकरी सव्वाशे क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. निश्चितच राज्यातील हवामान या जातीला मानवत असल्याने या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
पुसा रेड : या जातीची रब्बी हंगामात लागवड केली जात असल्याचे सांगितले जाते. हा देखील वाण उच्च उत्पादनासाठी ओळखला जातो. हा वाण लागवड केल्यानंतर साधारणतः १२० दिवसात परिपक्व बनतो आणि एकरी 110 क्विंटल पर्यंतचे उत्पादन यापासून मिळते.
एन-2-4-1 : रब्बी हंगामासाठी या जातीची शिफारस केली जाते. या जातीचा कांदा काढणीनंतर पाच ते सहा महिने टिकतो. रब्बी हंगामात या वाणाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती होते. लागवड केल्यानंतर साधारणता 120 दिवसांनी या जातीपासून उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. विशेष बाब म्हणजे हेक्टरी 30 ते 35 टन पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळते असे काही तज्ञांनी सांगितले आहे. याशिवाय ॲग्री फौंड लाईट रेड, भीमा किरण भीमाशक्ती यांसारख्या कांद्याच्या जातीचे देखील राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादण घेतले जाते.