गव्हाच्या पिकासाठी कधी, कसं व किती पाणी दिले पाहिजे ? कृषी तज्ञ काय सांगतात ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : येत्या काही दिवसात राज्यात गहू पेरणीला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात शेतकरी बांधव गव्हाची पेरणी करणार आहेत. काही शेतकरी बांधव उशिराने गव्हाची पेरणी करतात. 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत गव्हाची उशिराने पेरणी केली जाते.

कृषी तज्ञ मात्र शेतकऱ्यांना 15 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी करू नये असा सल्ला देतात. खरंतर गहू हे एक प्रमुख अन्नधान्य पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यातील बहुतांशी भागात पेरणी केली जाते.

याही हंगामात मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी होणार आहे. अशा स्थितीत आज आम्ही शेतकऱ्यांसाठी गव्हाला कधी, कसं व किती पाणी दिले पाहिजे? गहू पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे केले पाहिजे याविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन हजर झालो आहोत.

जमिनीच्या पोतनुसार गहू पिकासाठी पाणी व्यवस्थापन

जर भारी जमिनीत गव्हाची पेरणी केलेली असेल तर 18 दिवसाच्या अंतराने सहा पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत.

तसेच जर शेतकऱ्यांनी मध्यम जमिनीत गव्हाची पेरणी केलेली असेल तर पंधरा दिवसांच्या अंतराने सात पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत.

याशिवाय हलक्या जमिनीत जर गव्हाची पेरणी केलेली असेल तर शेतकरी बांधवांनी 10 ते 12 दिवसांच्या अंतराने आठ ते दहा पाण्याच्या पाळ्या गहू पिकाला देणे आवश्यक आहे.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन

जर शेतकऱ्यांनी कोरडवाहू भागात गहू पेरणी केली आणि पिकाला एकच पाणी देण्यासाठी पाण्याचा साठा उपलब्ध असेल तर पेरणीनंतर 40 ते 42 दिवसात पाणी द्यायचे आहे. जर समजा पिकाला दोन पाणी देण्याइतके पाणी असेल तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी दिले पाहिजे.

तसेच जर एखाद्या शेतकऱ्याकडे पिकाला तीन पाणी देन्याइतके पाणी असेल तर त्यांनी पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी पेरणीनंतर 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरे पाणी पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी दिले पाहिजे.

या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नका

कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, शेतकरी बांधवांनी गहू पिकाला मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 21 दिवसाच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच फुटवे फुटण्याचा अवस्थेत म्हणजे 40 ते 42 दिवसात पाण्याचा ताण पडू देऊ नये.

ओंबीवर येण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुलोरा अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर 70 ते 80 दिवसांनी पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच दाण्यात चीक भरण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर 90 ते 100 दिवसांनी पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. 

Leave a Comment