रब्बी हंगामात गहू लागवड करताय ? ‘या’ सुधारित वाणांची पेरणी करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा सविस्तर 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : यंदाचा मान्सून आता माघारी फिरत आहे. राज्यातील जवळपास 50 टक्के भागांमधून मानसूने माघार घेतली आहे. येत्या दोन-तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यात आता पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे.

आगामी काही दिवसात आता थंडीची तीव्रता देखील वाढणार आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात रब्बी हंगामातील पीक पेरणीला सुरुवात होणार आहे. यावर्षी गहू या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे.

खरंतर गहू हे एक प्रमुख अन्नधान्य पीक असून रब्बी हंगामात या पिकाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात पेरणी होते. संपूर्ण भारतवर्षात गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या राज्यातही या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते.

एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान गव्हाची वेळेवर पेरणी केली जाते. अशा परिस्थितीत आगामी काही दिवसात गहू पेरणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे आज आपण गव्हाच्या काही सुधारित वाणाची माहिती जाणून घेणार आहोत.

गव्हाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे

राज 4037 : राज्यात या जातीची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. या वाणाची पेरणी केल्यानंतर साधारणता 104 दिवसात पीक परिपक्व बनते. या जातीपासून हेक्‍टरी 41 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीचे पीक 74 cm पर्यंत वाढते. म्हणजेच हा एक मध्यम उंचीचा प्रकार आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा वाण तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. या जातीच्या गव्हाचे 1000 दाण्यांचे वजन 44 ग्रॅम पर्यंत भरते.

MACS 6478 : महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या जातींमध्ये यादेखील जातीचा समावेश होतो. राज्यातील हवामान या जातीला मानवते. या जातीचा पीक परिपक्व कालावधी 110 दिवसांचा आहे. या जातीपासून साधारणतः 45 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. विशेष म्हणजे हा वाण काळा आणि तपकिरी तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे.

UAS 428 : या जातीची बागायती क्षेत्रासाठी आणि वेळेवर पेरणी करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. हा एक मध्यम कालावधीचा वाण असून साधारणता 108 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते. या जातीपासून सरासरी 48 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

AKW 4627 : हा एक अल्पकालावधीत तयार होणारा वाण आहे. पेरणीनंतर साधारणता 78 ते 100 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. या जातीपासून 36 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळते. हा वाण तांबेरा आणि करपा रोगाचा प्रतिकारक्षम आहे. या जातीची विदर्भ विभागासाठी ओलिताखाली आणि उशिरा पेरणीसाठी शिफारस करण्यात आले आहे.

Leave a Comment